संशोधनात सांगितल्यानुसार, विटामिन-डी शरीरामध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फेटची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठीही मदत करते. हाडं, स्नायू आणि दात मजबूत करण्यासोबतच आजारांशी लढण्यासाठीही मदत करतं. त्यामुळेच शरीरातील व्हिटॅमिन-डी ची पातळी नियंत्रणात असेल तर त्या व्यक्तीचं सर्दी, खोकला किंवा ताप यांसारख्या आजारांपासून रक्षण होतं. तसेच शरीराच्या जखमा भरून निघण्यासाठी व्हिटॅमिन-डी फायदेशीर ठरतं. पण हेच जर शरीरामध्ये व्हिटॅमिन-डी ची कमतरता असेल तर सुस्ती, थकवा आणि अशक्तपणासारख्या समस्या उद्भवतात.

दरम्यान, अनेक लोकांसाठी व्हिटॅमिन-डी ची कमतरता एक समस्या बनली आहे. ज्यामुळे सध्या अनेक तरूणांनाही हात-पाय आणि सांधेदुखीसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ऑस्टियोपोरोसिस यांसारखा हाडांचा गंभीर आजार होऊ शकतो. या सर्व समस्यांपासून बचाव करण्यासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये फिरणं फायद्याचं ठरतं. त्यामुळे थंडीमध्ये हेल्दी राहण्यासाठी शरीरातील व्हिटॅमिन-डी ची पातळी नियंत्रणात ठेवा.