एकदा कोरोना विषयावर मैत्रीणींशी फोनवर बोलताना लक्षात आले कि, खऱ्या अर्थाने अभाव आहे तो हॅण्ड सॅनिटायझर वापरामुळे होणाऱ्या आगेच्या धोक्याचा. आश्चर्य तर तेव्हा वाटलं जेव्हा मला कळलं कि, माझ्याच पालकांना माहित नव्हतं कि हॅण्ड सॅनिटायझर आग पकडू शकते. आणि ह्याच माहितीने मला विचार करण्यास भाग पाडले. सामान्यतः हॅण्ड सॅनिटायझर वापरले जातात सूक्ष्मजंतू किव्हा जंतूनवर रोख ठेवण्यासाठी किव्हा त्यांना मारण्यासाठी. आम्ही संशोधक असल्याने आम्हास माहित आहे कि,अल्कोहोलमूळे आग पेट घेऊ शकते परंतु सामान्य नागरिक ह्या महत्वाच्या माहितीपासून वंचित आहे असे आम्हास आढळून आले. सध्या कोरोनामूळे हॅण्ड सॅनिटायझर चा बेसुमार वापर होऊन तो आपल्या दैनदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.आणि म्हणूनच हॅण्ड सॅनिटायझर वापराचे परिणाम आणि दुष्परिणाम सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचणे अत्यंत गरजेचे आहे.
जागतिक आरोग्य संघटना (WHO,अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रे (CDC) यांच्या नियमावलीनुसार ६० टक्के अल्कोहोल जंतूंचा नाश करू शकते किव्हा इतरांना जंतूंचा प्रसार होण्यापासून रोकु शकते. तसेच अल्कोहोल जिवाणू विषाणू, बुरशी इत्यादींचाही नाश करू शकतात. अल्कोहोल हे पर्यावरणीय परिस्थितीत स्थिर राहते आणि त्याचा विषाक्तपणा देखील कमी आहे.
तशी हॅण्ड सॅनिटायझरला लोकप्रियता प्राप्त झाली ती १९९० च्या अगोदर पासून परंतु त्याचा वापर वाढला तो ह्या जिवघेण्या कोरोनाआजारामुळेच. आपल्या शासनाने देखील अल्कोहोल पासून तयार होणाऱ्या सॅनिटायझरचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. ज्या ठिकाणी साबण आणि पाणी उपलब्ध नसेल त्या ठिकाणी आपण याचा वापर करू शकतो. मात्र, बऱ्याच नागरिकांना हे माहित नाहीय कि अल्कोहोल आगेच्या संपर्कात आल्यास मोठा पेट घेऊ शकते. दरम्यानच्या काळात हॅण्ड सॅनिटायझरमुळे लागणाऱ्या आगीच्या दुर्घटना आपल्या समोर आल्यात.
हरियाना मध्ये ३० मार्च रोजी एका ४४ वर्षाच्या नागरिकांच्या कुर्त्यावर हॅण्ड सॅनिटायझर सांडले असता तो लगेच गॅस च्या सानिध्यात आल्याने त्याच्या कपड्याने पेट घेतला होता. तसेच, एप्रिल महिन्यात मुंबई मधील एका सॅनिटायझर कारखान्याला आग लागल्याने २ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र त्याच मूळ कारण अजूनहि कळलेलं नाही. मागील महिन्यामध्येही गुरगाव येथेही सॅनिटायझर कारखान्याला आग लागण्याची दुर्घटना आपल्या समोर आलेली आहे. तसेच, महाराष्ट्र, तामिळनाडू व इतर राज्यातील नागरिकांनी याचा दारू म्हणून उपयोग केला असता त्यांना आपला जीव गमवावा लागला. आपल्या सोबत आपल्या वाहनांना देखील सॅनिटायझ करताना आग लागलेली घटना अहमदाबाद येथे मागील महिन्यात घडली. या व्यतिरिक्त बर्याचश्या दुर्घटना मागील काही महिन्यात घडल्या असाव्यात पण त्या आपल्या समोर येऊ शकल्या नाही.
डेटॉल, लाईफबॉय, सवलोन, हिमालया, डाबर तसेच काही स्थानिक ब्रँड चे हॅण्ड सॅनिटायझर सध्या सर्वच बाजारपेठेत सहज उपलब्द होत आहेत. बहुतांशी सॅनिटायझर मध्ये ९६% इथेनॉल किव्हा आयसोप्रोपॅनॉलचे प्रमाण असते जे कि त्याचे महत्वाचे घटक आहेत. याव्यतिरिक्त रंग देणारे, सुगंध देणारे, संरक्षक घटके, फेस आणणारे घटके आणि काही प्रमाणात निर्जंतुकीकरण केलेले पाणी या घटकांचाही समावेश यामध्ये होतो. आणि ह्या सर्वच सॅनिटायझर कंपन्यांनी हे ज्वलनशील असल्याचे नमूदही केले आहे.अल्कोहोल पासून तयार झालेले सॅनिटायझरची क्लास १ ह्या ज्वलनशील गटात वर्गीकरण केलेले असून त्याच्या वाफेचा ज्वलनांक हा १०० डिग्री फ्रॅंरणहाईट पेक्षा कमी आहे. अल्कोहोलच्या वाफा ज्वलनशील तर आहेच परंतु त्याला आग लागताच त्यातून कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साइड हे अतिविषारी वायूही बाहेर पडतात. सॅनिटायझरचे सेवन हे मूत्रपिंड आणि यकृतासाठी अतिविषारी व धोकादायक असून त्यामुळे जीवहि गमवावा लागू शकतो. त्यामुळे जरी सॅनिटायझर मध्ये अल्कोहोल असले तरी त्याचा कधीच दारू म्हणून वापर होता काम नये. आणि म्हणूनच अल्कोहोल पासून तयार झालेल्या सॅनिटायझरचा योग्य वापर व्हावा यासाठी आपण सर्वांनी दक्ष असायला हवे.
सॅनिटायझर वापरताना आपण काही महत्वाच्या गोष्टीचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. जसे की, सॅनिटायझरचा वापर नेहमी आगीपासून काही अंतरावर करावा. पुरेसे सॅनिटायझर घेऊन दोन्ही हात कमीत कमी ३० सेकण्ड चांगले चोळावे आणि त्यानंतर आपले हात चांगले कोरडे होऊन द्यावेत. जसे कि आपणास माहित आहे कि, काही नियमांचे पालन करीत आपल्या देशातील बरीच महत्वाची शहरे पुनःश्च एकदा पूर्वपदावर येत आहेत. उद्योगधंद्यांनाही हळूहळू चालना मिळत आहे. मेडिकल सेवा व्यतिरिक्त इतरही दुकाने,कार्यालये, कारखाने आता उघडण्यास सुरुवात होत आहे. त्यामुळे,आपल्या सुरक्षेची काळजी लक्षात घेता सॅनिटायझरचा वापर हि काळाची गरज बनली आहे. सॅनिटायझर वापरण्याची आपण योग्य ती खबरदारी घेऊन त्याच्या गैरवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी आपण जागरूकता निर्माण केली पाहिजे. सॅनिटायझर कंटेनरच्या लेबलवर नमूद केलेली रचना आणि ते योग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन कारखाने करतात की नाही हे तपासण्यासाठी लोकांना शिक्षण दिले पाहिजे. यामुळे बनावट किंवा कमी दर्जाच्या सॅनिटायझर्सच्या विक्रीवर अंकुश ठेवण्यास मदत होईल.
मी रूपा पराते व माझ्या काही मैत्रिणी जिनी चाको, विद्याश्री मापारे, विभावरी सपकाळे, रेचेल सॅमसन आणि मेघाना थोरात इ. संशोधक या नात्याने सॅनिटायझर्स चा योग्य वापर आणि सुरक्षेबद्दलचे मार्गदर्शन व जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तसे पहिले तर, हात धुण्यासाठी साबण आणि पाण्याचा वापर करणे ही सर्वात चांगली पद्धत आहे. तथापि, हात धुणे शक्य नसल्यास आपण सॅनिटायझर आवश्यक ती काळजी घेऊन वापर करू शकतो. चला तर मग, एक जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वच चांगल्या निरोगी पद्धतींचा अवलंब करून कोरोनाव्हायरसचा प्रसार थांबविण्यासाठी एकत्रितपणे लढा देऊ.
#सुरक्षितराहा #निरोगीराहा #सकारात्मकराहा #सावधरहा