पिंपरी चिंचवड : करोनो वायरस ने सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसमुळे चीनमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भारतामध्ये देखील करोनो व्हायरस ची लागण झालेला रुग्ण आढळला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेने तातडीने यशवंतराव चव्हाण रुग्णालयात करोना विषाणू रुग्णासाठी स्वतंत्र कक्ष तत्काळ स्थापन करण्यात यावा, तसेच आरोग्य व वैद्यकीय विभागामार्फत या विषाणूचा प्रादुर्भाव प्रतिबंध व नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना त्वरित राबविण्यात याव्यात अशी मागणी नगरसेवक संदिप वाघेरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
संदीप वाघेरे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या अनेक देशांमध्ये ‘करोना’ व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. चिनच्या वुहान शहरातून हा जिवघेणा व्हायरस इतर देशांमध्ये पसरला आहे. अमेरिका, चीन जापान, ऑस्ट्रेलिया, थायलंड, फ्रान्स, सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनाम अशा देशांमध्ये या करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या जिवघेण्या व्हायरसमुळं जगभरात आत्तापर्यंत तब्बल २०० लोकांचा मृत्यू झाला आहे.
भारतामध्ये सद्यस्थितीला केरळ मध्ये करोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आलेला असून त्याला केरळ मधील विलगीकरण केलेल्या कक्षामध्ये भरती केले गेलेले आहे. आपल्या पिंपरी चिंचवड उद्योगनगरीमध्ये असंख्य नागरिक बाहेरून दाखल होत असतात, त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालयामध्ये नवीन करोना विषाणू रुग्णासाठी स्वतंत्र कक्ष तत्काळ स्थापन करण्यात यावा,तसेच आरोग्य व वैद्यकीय विभागामार्फत या विषाणूचा प्रादुर्भाव प्रतिबंध व नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना त्वरित राबविण्यात याव्यात अशी पिंपरी येथील नगरसेवक संदिप वाघेरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.