पुणे : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत केक कापत नववर्षाचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी वायरलेसवरुनही कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी नियंत्रण कक्षात जाऊन काही लोकांच्या तक्रारीदेखील ऐकून घेतल्या. पोलीस थकले जरूर पण हिंमत हारलेले नाहीत असं म्हणत त्यांनी पोलिसांची पाठ थोपटली.
अनिल देशमुख यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात नववर्ष साजरा करताना नियंत्रण कक्षात जाऊन स्वतः काही कॉल घेतले. यामध्ये एका नागरिकाने सोसायटी परिसरात मोठ्याने गाणी वाजत असल्याची तक्रार केली असता अनिल देशमुख यांनी त्यांना आपली तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनला सांगतो असं कळवलं. थेट गृहमंत्र्यांशी संवाद झाल्याने पुणेकरालाही आश्चर्याचा धक्का बसला.
- काय संवाद झाला:
अनिल देशमुख : हॅलो नमस्कार, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलत आहे. आपली काय तक्रार आहे. आपल्या सोसायटीचे नाव काय आहे.
तक्रारदार : अहो साहेब मी सनसिटी जवळील शिवसागर सोसायटी परिसरातून बोलत आहे. आमच्या सोसायटीच्या परिसरात जोरात गाणी वाजत आहे. खूप त्रास होत आहे.
अनिल देशमुख: आपल्या जवळील पोलीस स्टेशनला लगेच तक्रार सांगतो. तुमचं नाव काय?
तक्रारदार: माझ नाव इंद्रनील आपटे आहे.
अनिल देशमुख: या तक्रारीबद्दल आपणास कळवितो आणि तुम्हाला तुमच्या परिवाराला नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…