मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध संगीतकार जोडगोळी साजिद-वाजिदमधील वाजिद खान यांचे रविवारी रात्री मुंबईतील हॉस्पिटलमध्ये निधन झाले. यामुळे बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी किडनी इन्फेक्शनमुळे त्यांचा मृत्यू झाला.
गेल्या महिन्यात बॉलिवूडला दोन मोठे धक्के बसले होते. अभिनेता इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या मृत्यूचे धक्के पचवत नाहीत तोच आज वॉन्टेड, दबंग, एक था टायगरसारख्या सिनेमांना संगीत देणारे वाजिद खान यांचे निधन झाले आहे.
Maharashtra: Music composer & singer Wajid Khan passes away at a hospital in Mumbai. pic.twitter.com/PnWkX5RrCq
— ANI (@ANI) May 31, 2020
गेल्या काही दिवसांपासून वाजिद खान यांच्यावर चेंबूर येथील सुराना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते, असे संगितकार सलीम मर्चंट यांनी सांगितले. वाजिद किडनीची समस्या होती. यामुळे काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपन शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी किडनीमध्ये इन्फेक्शन झाल्याने गेल्या ४ दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
साजिद-वाजिद या जोडगोळीने १९९८ मध्ये सलमान खानच्या प्यार किया तो डरना क्या मधून सुरुवात केली होती. यानंतर गर्व, तेरे नाम, तुमको ना भूल पाएंगे, पार्टनर, दबंग सारख्या सिनेमांच्या गाण्यांची रचना केली होती. वाजिद यांनी सलमानसाठी मेरा ही जलवा, फेव्हिकॉल से ही गाणी गायली होती. तर अक्षय कुमारसाठी चिंता ता चिता चिता हे गाणे गायले होते. त्यांनी सध्या लॉकडाऊन काळात सलमानचे प्यार करोना आणि भाई भाई गाणेही कंपोझ केले होते.