पिंपरी चिंचवड : कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी पहिल्यापासूनच पोलीस कर्मचारी अग्रेसर आहेत. आज देखील ते न थकता आपलं कर्तव्य अगदी चोखपणे बजावत आहेत. अशावेळी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख हे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे नेहमी दिसून आले आहे. तसेच पोलिसांच्या सुख-दुःखातही ते सहभागी होताना दिसत आहेत. आज सकाळी पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना पुणे-मुंबई द्रुतगतीमहामार्गावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांचा त्यांनी वाढदिवस साजरा करीत, त्यांना शुभेच्छा दिल्या! थेट गृहमंत्र्यांनीच अचानकपणे भेट देवून केक कापून वाढदिवस साजरा केल्याने जाधव देखील भारावून गेले होते.
आज पुण्यावरुन मुंबईला जाताना एक्सप्रेस हायवेवर किवळे फाटा येथे कर्तव्यावर असलेले पोलिस अधिकारी / कर्मचारी यांचेशी संवाद साधतांना समजले की उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला व त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/J1me2uVssP
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) June 8, 2020
कोरोना विषाणूने शिरकाव केल्यापासून पोलीस यंत्रणा सज्ज असून आपलं कर्तव्य अगदी चोखपणे बजावत आहे. महाराष्ट्रात हजारो पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर काहींचा यामुळे मृत्यू देखील झाला आहे. परंतु, न डगमगता ते आपले कर्तव्य बजावत आहेत. अशा वेळी पोलिसांना पाठिंब्याची आणि सोबत असल्याची भावना गृहमंत्री देशमुख हे करून देत आहेत. पोलिसांच्या प्रत्येक सुख दुःखात ते सहभागी होतात. त्यांच्याशी संवाद साधत त्यांचं मनोबल वाढवत आहेत.
गृहमंत्री अनिल देशमुख हे रविवारी दिवसभर पुणे शहरात होते. आज सकाळी ते मुंबईला निघाले होते. तेव्हा, पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर किवळे फाटा येथे कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांशी थांबून त्यांनी संवाद साधला. संवाद साधत असताना कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांचा वाढदिवस असल्याचं गृहमंत्री यांना समजलं. यावेळी जाधव यांच्यासाठी एक केक मागवून तो कापायला लावून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थापही मारली. हा जाधव यांच्यासाठी सुखद धक्का असल्याने ते भाराहून गेले होते.