पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत च-होली, रावेत आणि बो-हाडेवाडी येथे आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी बांधण्यात येणा-या सदनिकांसाठी येत्या सोमवारी (दि.११) सोडत काढली जाणार आहे. तीनही प्रकल्पातील ३६६४ सदनिकांची संगणकीकृत सोडत काढण्यात येणार आहे. याबाबतची माहिती महापौर उषा ढोरे, सभागृह नेते नामदेव ढाके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सोमवारी दुपारी ३ वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ही सोडत काढली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत.केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी गरीबी निर्मुलन मंत्रालयाच्या वतीने पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमाअंतर्गत महापालिका क्षेत्रात पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. च-होली, रावेत आणि बो-हाडेवस्ती येथे आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी घरे बांधण्याचे काम सुरू केले आहे.
यासाठी महापालिकेने अर्ज मागविले होते. एकूण ४७ हजार ८७८ अर्ज आले होते. त्यापैकी ४७ हजार ८०१ अर्ज पात्र ठरले आहेत.च-होतील १४४२ सदनिका, रावेतमध्ये ९३४ आणि बोऱ्हाडेवाडीत १२८८ अशा एकूण ३६६४ सदनिका असणार आहेत. या योजनेकरिता ३६६४ सदनिकेची निवड यादी, त्याच प्रमाणात प्रतिक्षा यादी करण्यात येणार आहे. सदनिका धारकास प्रथमत: १० टक्के स्वहिस्सा भरावा लागेल.