- खासदार शरद पवारांची घेतली भेट
- जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी उपचारासंदर्भात केली सविस्तर चर्चा
- राज्य व केंद्र सरकारकडून मदत मिळवण्याचा पवारांनी दिला आमदार लांडे यांना शब्द
पिंपरी चिंचवड : भोसरी येथील चिमुकल्या वेदिकाच्या उपचारासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले आहेत. वयाच्या आठव्या महिन्यात निष्पन्न झालेल्या दुर्धर अजारातून भोसरीतील चिमुकली वेदिका शिंदे हिला बरी करण्यासाठी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे देखील पुढे सरसावले आहेत. उपचारासाठी आवश्यक मदत करण्यासाठी माजी आमदार लांडे यांनी प्रयत्न पनाला लावले आहेत. वेदिकाला झोलगेन्स्मा (Zolgensma) इंजेक्शन देण्यासाठी १६ कोटींचा खर्च अटोक्याबाहेरचा असल्याने यातून मार्ग काढण्यासाठी माजी आमदार लांडे त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी देखील चर्चा करून वैद्यकीय मार्गदर्शन घेण्यात आले.
कु. वेदिका शिंदे ही पुण्यामधील भोसरी येथील रहिवासी सौरभ शिंदे व स्नेहा शिंदे यांची एकुलती एक मुलगी आहे. तिला ‘एसएमए’ प्रकार – १ (SMA (spinal muscular atrophy) type -1) हा दुर्मिळ आजार झाला आहे. हा आजार खूप जलद गतीने बाळाच्या नसा आणि स्नायूंना कमकुवत करतो. जसजसे हे प्रमाण वाढत जाते तसतसे रुग्णाला श्वास घेणे, चालणे, शरीराची हालचाल करणे, मान धरणे या सगळ्या क्रिया करताना त्रास व्हायला सुरुवात होतो. वेळेवर उपचार मिळाले नाहीत, तर शरीरातील सगळे भाग निकामी होऊन रुग्ण दगावतो. वेदिका आत्ता ८ महिन्यांची आहे. तिला या समस्या सुरू झाल्या आहेत. तिच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वेदिकाला पुढील दोन महिन्यांमध्ये लस देण्याची आवश्यकता आहे. दोन महिन्यांच्या आत लस दिली तर वेदिका पूर्णपणे ठणठणीत बरी होऊ शकते. लसीचे नाव – झोलगेन्स्मा (Zolgensma) असे आहे. ही लस अमेरिकेतून आयात करावी लागणार आहे. या लसीची किंमत सुमारे १६ कोटी रुपये आहे.
सौरभ शिंदे यांची कौटुंबिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे त्यांना एवढा मोठा खर्च न पेलणारा आहे. हे पैसे जमा करण्यासाठी त्यांनी समाजातील दानशूर व्यक्तींकडून मदतीची आपेक्षा व्यक्त केली. ही बाब भोसरीचे माजी आमदार लांडे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने सौरभ यांना बोलावून घेतले. त्यांच्याशी चर्चा केली. लसीचा खर्च अटोक्याबाहेरचा असल्याने त्यांनी तातडीने राज्यातील महाविकास आघाडीचे जनक शरद पवार यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी (दि. 12) मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी वेदिकाचे वडिल सौरभ आणि शरद पवार यांची भेट घडवून आणली. त्यांच्याशी वेदिकाच्या अजारासंदर्भात सविस्तर चर्चा केली. वैद्यकीय उपचारासाठी येणारा संपूर्ण खर्च सांगितला. त्यावर पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकार पातळीवर सहकार्य करण्याचा विश्वास दिला. त्यानंतर जे. जे. रुग्णालयाचे पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची भेट घेतली. त्यांनी वेदिकाचे वडिल सौरभ आणि त्यांचे सहकारी यांना उपचारासंदर्भात मार्गदर्शन केले.
- जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री सहायता निधीमधून काही मदत उपलब्ध करून देण्याचा शब्द त्यांनी दिला. दिल्लीतील केंद्र सरकारला इंजेक्शनचा आयात कर रद्द करण्याची शिफारस राज्य सरकारतर्फे केली जाईल. पक्षाच्या माध्यमातून देखील काही स्वरुपात मदत केली जाईल. आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांच्याकडून वैद्यकीयदृष्ट्या काही खर्च वाचवता येईल का ?, याचा विचार करून शक्य तेवढी मदत करण्यासाठी मंत्री पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
– सौरभ शिंदे, वेदिकाचे वडिल
वेदिकाच्या उपचारासंदर्भात शुक्रवारी (दि. 12) शरद पवार यांची भेट घेतली. जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचे मार्गदर्शन घेतले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी भेट दिली. मात्र, ते कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यांच्याकडेही पाठपुरावा करणार आहे. नंतर राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. त्यांनी देखील पक्षाच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांच्या माध्यमातून वैद्यकीय खर्च वाचवता येईल का ?, याचा देखील विचार होत आहे. मुळात वेदिका ही भोसरीची कन्या आहे. तिला स्पाईनल मस्क्युलर अॅट्रोफी (spinal muscular atrophy) या अजारातून बरी करण्यासाठी आर्थिक मदत करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. खर्च मोठा असला तरी शक्य तेवढी मदत उपलब्ध करून देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे आले पाहिजे.
– विलास लांडे, माजी आमदार, भोसरी विधानसभा